Sunday 29 May 2016

शांत रहाणे ही शक्तिची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ति आहे.

जरा वैचारिक

तलावाचा तळ आपणास दिसत नाही, कारण त्याचा पृष्ठभाग तरंगांनी झाकलेला असतो. या तळाचे दर्शन , हे तरंग विरून पाणी शांत झाले म्हणजे होते.पाणी गढुळ किंवा सारखे हिंदकळत असेल तर तळ दिसणार नाही.पण जर ते स्वच्छ असून त्यात लाटा उसळत नसतील तर तळ दिसेल.

आपले खरे स्व-रुप , आपला आत्मा तलावाच्या तळासारखा आहे, चित्त हे तलावासारखे आहे आणि त्याच्या वृत्ती या तलावावरील तरंगांप्रमाणे आहेत.

याचप्रमाणे आणखी एक गोष्ट आढळून येते ती ही की मनाच्या ३ अवस्था असतात
१. अंधकाराची किंवा तमाची - ही पशुत व मुढ व्यक्तींमधे दिसुन येते.लोकांचे फक्त अनिष्ठ करीत रहाणे हेच या अवस्थेतील कार्य असते. यावाचून मनात दुसरा कोणतही विचार येत नाही.
२. क्रियाशील किंवा रजाची - मुख्यतः सत्ता आणि भोग हे दोनच हेतु मना मध्ये सळसळत असतात, मी सामर्थ्यवान होइल आणि इतरांवर सत्ता गाजवीन असे या अवस्थेत वाटत असते.
३. सत्व - हिच्यात प्रसन्नता. आणि शांतीचा अनुभव येतो. सर्व तरंग नाहीसे होतात आणि मनरुपी तलावाचे पाणी स्वच्छ नितळ होते. ही काही निष्क्रियतेची अवस्था नसून उलट ती अत्युत्कट क्रियाशीलतेची अवस्था आहे

शांत रहाणे ही शक्तिची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ति आहे.

वळवळ करीत रहाणे, क्रियाशील रहाणे कठीण नाही,जरा लगाम ढीला सोडला की घोडे चौखूर उधळलेच समजा. हे कोणीही करू शकतो. पण जो बेफाम घोड्यांना आवरू शकतो तोच खरा शक्तिमान म्हणावयचा, घोडे आवरायला जास्त ताकद लागते की ते मोकळे सोडून द्यायला?

शांत माणूस हा आळशी असत नाही, सत्व म्हणजे जाड्य किंवा आळस असा ग्रह कोणी करुन घेउ नये. शांत माणूस तोच की ज्याने आपल्या मनस्तरंगांना आपल्या कह्यात ठेवले आहे
म्हणूनच क्रियाशीलता ही कनिष्ठ प्रतीच्या सामर्थ्याची व शांती ही
श्रेष्ठ प्रतीच्या सामर्थ्याची अभिव्यक्ति आहे.

-विशाल

No comments:

Post a Comment