Monday 30 May 2016

एक विचित्र आणि विलक्षण बँक


मित्रांनो , तुम्हाला माहीत आहे का ? की सर्वच बँका मध्ये NPA i.e. Non Performing Assets  वाढले आहेत आणि त्या तोट्यात जात आहेत. वाटलेल्या आणि वाढलेल्या कर्जाची उधारी वसूल करताना त्यांना नाकीनउ येत आहे,

असे असूनही  विचित्र अशी  एक जुनी बँक आहे की ती अजूनही जास्तीची शहानीशा न करता कर्ज वाटत सुटली आहे. या बँकेचे सारेच नियम वेगळे आहेत. ती पासबुक, चेकबुक, internet, phone pin किंवा ATM कार्डही देत नाही. परंतु बँकेकडे प्रत्येक ग्राहकाचा चा जमाखर्च बिनचुक लिहीलेला आहे.
सर्व व्यवहार wireless and realtime चालतात. सारे व्यवहार उत्तम चालू आहेत आणि विशेष म्हणजे ही बँक तोट्यात नाही.

तुम्ही म्हणाल की काय वेड लागले आहे? असे कसे शक्य आहे?
हे काहीच नाही, ह्या बँकेच्या शाखाही सर्वात जास्त आणि सर्वत्र आहेत. या बँकेचे ग्राहकही सर्वात जास्त आहेत.

ह्या बँकेचा कारभार जरा विचित्र पद्धतिने चालतो. तुम्हाला या बँकेत account open करायला जावे लागत नाही, कोणतीही documents द्यावी लागत नाही, अगदी कर्ज काढतानाही तसेच. बँक स्वतःच तुमचे खाते उघडते. गमत्त म्हणजे या बँकेत प्राण्यांचे, पक्ष्यांचे, किड्यांचे पण खाते असते़.

बँकेची जमा आणि खर्चाची हिशोबाची पद्धत फारच भन्नाट आहे.तुम्हाला जर स्वतःच्या खात्यात पैसे भरायचे असतील तर तुम्ही तसे direct करू शकत नाही. तसे केल्यास कर्जाची रक्कम थोडी कमी होते. स्वतःच्या खात्यात पैसे भरायचे असतील तर तुम्हाला कुण्या दूसराच्या खात्यात पैसे जमा करावे लागतात. दुसरी व्यक्ती गरजु असावी लागते व ते खाते कुणाचेही असू शकते.तुम्ही भरलेल्या रकमेवरून आणि गरजू व्यक्तिला झालेला फायदा ,याच्या वरून चक्रव्याढ पद्धत्तीने पैसे तुमच्या खात्यात जमा होतात.

तुमचे थोडे जरी पैसे जमा असतील किंवा नसतील तरीही तुम्ही ते काढु शकता. अगदी मागच्या जन्मात खात्यात भरलेले पैसेही या जन्मात काढु शकता. बँकेला कर्जवसुलीची अजिबात घाई नाही.

तुमच्या खात्यात किती शिल्लक आहे ? हे बँक तुम्हाला अजिबात कळू देत नाही. गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव या बँकेला चालत नाही. कोणालाही अहंकार होउ नये असे बँकेला वाटते. बँकेची Data security एकदम भारी आहे, Server hack करणे केवळ अशक्यच.
तुमची छोटी छोटीही सोपी कामे पण कष्ट करून जर होत नसतील तर समजा की खात्यातील पैसे संपत आले आहेत आणि जर मोठ्यात मोठी अवघड कामे सहजच होत असतील तर समजावे की खात्यात भरपूर पैसे आहेत

बँकेचे नियम पण जरा विचित्रच आहेत. कर्ज फेडायला वेळ लागत असेल तर बँकेचे कर्मचारी अधूनमधुन शिक्षा करतात.अगदी या जन्मात फेडू नाही शकलात तर पुढच्या जन्मात .

कधी कधी लायकीपेक्षा  ( खात्यात शिल्लक नसताना ) जास्त पैसे उचलले आणि शहाणपणा केलात किंवा पैशाचा माज अथवा गैरवापर केलात तर मोठी शिक्षा लगेचच. बँकेचे कर्मचारी चिडले तर शिक्षा म्हणुन ताबडतोब वधही करु शकतात.

अरे बापरे ! काय सांगता ? Direct वध ?

हो घाबरलात ना ? पण घाबरू नका .जर का तुम्ही या बँकेचे उपकार वेळोवेळी मान्य करून , बँकेच्या कर्मचार्यांबरोबर नम्रपणे, प्रेमाने वागल्यास , किंवा केलेल्या चुकीची कबुली वारंवार मनापासून दिल्यास , कर्मचारी कर्ज माफ करतात, ताबडतोब , शिक्षापण देत नाहीत.सगळचं विलक्षण !

काय सांगता , तुम्हाला या बँकेत नोकरी पाहीजे?
कर्मचारी होण्यासाठी तुमच्यावर कोणतेही कर्ज असता नये
अधिकारी होण्यासाठी तुम्ही आधी कर्मचारी असला पाहीजे आणि विशेष करून तुमच्या खात्यात भरपूर शिल्लक हवी. बँकेचे विविध अधिका-र्याशी तुमची ओळख हवी.

तशी थोडी कठोर पण बरीचशी सहाय्यक आणि दयाळू बँक आहे ही.

पण नाव काय हो या बँकेचे? तुम्हाला आत्तापर्यंत कळले असेलच की ही परमेश्वराची बँक आहे, सर्व व्यवहार गुप्तपणे चालवणारी बँक ऑफ चित्रगुप्त !!! आपली सर्वांचीच लाडकी .

- विशाल

Sunday 29 May 2016

शांत रहाणे ही शक्तिची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ति आहे.

जरा वैचारिक

तलावाचा तळ आपणास दिसत नाही, कारण त्याचा पृष्ठभाग तरंगांनी झाकलेला असतो. या तळाचे दर्शन , हे तरंग विरून पाणी शांत झाले म्हणजे होते.पाणी गढुळ किंवा सारखे हिंदकळत असेल तर तळ दिसणार नाही.पण जर ते स्वच्छ असून त्यात लाटा उसळत नसतील तर तळ दिसेल.

आपले खरे स्व-रुप , आपला आत्मा तलावाच्या तळासारखा आहे, चित्त हे तलावासारखे आहे आणि त्याच्या वृत्ती या तलावावरील तरंगांप्रमाणे आहेत.

याचप्रमाणे आणखी एक गोष्ट आढळून येते ती ही की मनाच्या ३ अवस्था असतात
१. अंधकाराची किंवा तमाची - ही पशुत व मुढ व्यक्तींमधे दिसुन येते.लोकांचे फक्त अनिष्ठ करीत रहाणे हेच या अवस्थेतील कार्य असते. यावाचून मनात दुसरा कोणतही विचार येत नाही.
२. क्रियाशील किंवा रजाची - मुख्यतः सत्ता आणि भोग हे दोनच हेतु मना मध्ये सळसळत असतात, मी सामर्थ्यवान होइल आणि इतरांवर सत्ता गाजवीन असे या अवस्थेत वाटत असते.
३. सत्व - हिच्यात प्रसन्नता. आणि शांतीचा अनुभव येतो. सर्व तरंग नाहीसे होतात आणि मनरुपी तलावाचे पाणी स्वच्छ नितळ होते. ही काही निष्क्रियतेची अवस्था नसून उलट ती अत्युत्कट क्रियाशीलतेची अवस्था आहे

शांत रहाणे ही शक्तिची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ति आहे.

वळवळ करीत रहाणे, क्रियाशील रहाणे कठीण नाही,जरा लगाम ढीला सोडला की घोडे चौखूर उधळलेच समजा. हे कोणीही करू शकतो. पण जो बेफाम घोड्यांना आवरू शकतो तोच खरा शक्तिमान म्हणावयचा, घोडे आवरायला जास्त ताकद लागते की ते मोकळे सोडून द्यायला?

शांत माणूस हा आळशी असत नाही, सत्व म्हणजे जाड्य किंवा आळस असा ग्रह कोणी करुन घेउ नये. शांत माणूस तोच की ज्याने आपल्या मनस्तरंगांना आपल्या कह्यात ठेवले आहे
म्हणूनच क्रियाशीलता ही कनिष्ठ प्रतीच्या सामर्थ्याची व शांती ही
श्रेष्ठ प्रतीच्या सामर्थ्याची अभिव्यक्ति आहे.

-विशाल